नागभीड तालुक्यातील तब्बल चोवीस गावांमध्ये पोलीस पाटील पदे रिक्त असल्याने गावांतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलीस पाटील हे गावातील पोलीस यंत्रणेचे प्रतिनिधी मानले जातात आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, शांतता राखणे तसेच शासकीय अधिकार्यांना सहकार्य करणे हे त्यांचे प्रमुख कार्य असते.
मात्र, अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त असल्यामुळे काही गावांत अवैध धंदे फोफावत आहेत, लहानमोठ्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत आणि गावातील भांडणे थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत आहेत. काही ठिकाणी खुलेआम दारूविक्रीही सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पोलीस पाटील हे पद ब्रिटिश काळात स्थापन झाले असून, ग्रामपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे अर्धशासकीय पद महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या पदांची भरती तातडीने करून गावातील शिस्त आणि शांती पुनर्स्थापित करण्याची गरज आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.
रिक्त असलेली गावं —
किरमिटी, नवेगाव, मीनथुर, कोसंभी गवळी, कोटगांव, कोदेपार, बोन्ड, गोवारपेठ, सोनुली खुर्द, देवपायली, विलम, पाहार्णी, पांजरेपर, पान्होली मेंढा, देवटक, मोहाडी, रेंगातूर, कसरला, मागरूळ, हुमा खडकी, सावंगी बडगे, चिंधीचक, नवानगर, घोडाझरी.
शासनाने तातडीने भरती प्रक्रिया सुरू करून गावोगाव शांतता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी!
नागभीड तालुक्यातील २४ गावांत पोलीस पाटील पदे रिक्त; कायदा-सुव्यवस्था धोक्यात!
