चंद्रपूर, दि. 24 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक, प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप खरेदी हंगाम 2025-26 अंतर्गत धान खरेदीला 3 नोव्हेंबरपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. चिमूर, नागभीड, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा आणि पोंभुर्णा या 8 तालुक्यांमधील एकूण 33 खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी सुरू आहे.या खरेदी केंद्रांमध्ये नवखळा, मोहाडी मो., सावरगाव, चिंधीचक, बाळापूर, कोजबी, गिरगांव, जिवनापूर, गोविंदपूर, वाढोणा, तांबेगडी-मेंढा, लाढबोरी, मुरमाडी, कळमगांव गन्ना, शिवणी, गडबोरी, नाचनभट्टी, पेठगांव, चारगांव बु., वडधा तु. भटाळा, डोमा, खांबाडा, बोडधा, आंबेनेरी, अडेगाव देश, मासाळ, टेकेपार, मोटेगाव, चंदनखेडा, पोंभुर्णा टिडीसी, करंजी आणि चिंचोली या केंद्रांचा समावेश आहे.धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी अनिवार्यपणे करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आ.वि.क. सहकारी संस्थेच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधून ई-पिक पेरा केलेला सातबारा, नमुना 8 अ, आधारकार्ड, ई-केवायसी केलेले बँक पासबुक, संमतीपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह स्वतः उपस्थित राहावे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत धान विक्री करून खरेदी केंद्रावर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, चंद्रपूर यांनी केले आहे.
