• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

नागभीड शेतशिवारात जुगारावर धडक कारवाई; ५२ ताश पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या ७ जणांविरुद्ध गुन्हा, सव्वा ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ByRoshan Khankure

Dec 27, 2025
Spread the love

नागभीड पोलीस स्टेशन हद्दीतील शेतशिवार परिसरात ५२ ताश पत्त्यांवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांनी मोठी कारवाई करत सात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६ लाख ४३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी नागभीड पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे शेतशिवारातील बोरीच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. माहितीची खात्री करून नागभीड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची रेड सुरू होताच तीन इसम मोटारसायकल घटनास्थळी टाकून फरार झाले, तर चार इसमांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता जुगाराच्या डावावर व अंगझडतीतून १४,६५० रुपये रोख, चार मोबाईल फोन (किंमत ३१,५५० रुपये) तसेच घटनास्थळी असलेल्या सात मोटारसायकल (किंमत ५,९७,००० रुपये) आणि इतर जुगार साहित्य असा एकूण ६,४३,९५० रुपयांचा माल मिळून आला.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मल्ला रेड्डी आगा नरडेला, गोपीचंद पुनाराम नागपुरे, भूपेश महादेव चिलबुले आणि प्रदीप अरुण येरमे (सर्व रा. नागभीड) अशी आहेत. तर बादल बाबुराव गजभीये, राहुल अशोक पाटील आणि आकाश गुरुदास करकाडे (सर्व रा. नागभीड) हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
अटक व फरार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अन्वये पोलीस स्टेशन नागभीड येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पोटभरे, पोलीस अंमलदार गिरडकर (२२०), जितेंद्र मारभते (२३४) तसेच होमगार्ड यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *