चंद्रपूर (दि. २३ ऑक्टोबर २०२५) – शहरातील विधी महाविद्यालयाजवळ किरकोळ वादातून २७ वर्षीय नितेश वासुदेव ठाकरे याचा निर्दयी खून झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ कारवाई करत, अवघ्या एका तासाच्या आत खुनातील सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील विधी महाविद्यालय समोरील परिसरात नितेश वासुदेव ठाकरे (वय २७, रा. वार्ड क्र. १, बेताल चौक, दुर्गापूर) मृत अवस्थेत आढळले. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन रामनगरच्या पथकांनी घटनास्थळी पोहचून सखोल चौकशी सुरू केली.तपासादरम्यान आरोपी म्हणून करण गोपाल मेश्राम (२२, रा. भिमनगर, वार्ड क्र. ४, दुर्गापूर), यश छोटेलाल राऊत (१९, रा. भिमनगर, वार्ड क्र. ४), अनिल रामेश्वर बोंडे (२२, रा. समता नगर, दुर्गापूर), प्रतिक माणिक मेश्राम (२२, रा. भिमनगर, वार्ड क्र. ४), तौसिक अजीज शेख (२३, रा. फातेमा मस्जिद जवळ, वार्ड क्र. ३, दुर्गापूर) आणि सुजीत जयकुमार गणविर (२५, रा. भिमनगर, वार्ड क्र. ४, दुर्गापूर) यांचा समावेश आहे. प्रथमदर्शनी तपासात असे दिसून आले की आरोपींनी आपसी किरकोळ वादातून मृतकाचा खून केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी क्रमांक १ ते ५ तर पोलीस स्टेशन रामनगरच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी क्रमांक ६ यास ताब्यात घेतले.सदर प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगरमध्ये खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. मुमक्का सुदर्शन आणि अपर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे व पोलीस निरीक्षक श्री. आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टाफच्या विविध पथकांनी केली. तपास पथकात सपोनि, पोउपनि, पोहवा आणि पोअं यांचा समावेश असून त्यांनी धाडसी कारवाई केली.पोलीसांनी धाडसाने केलेल्या या कारवाईतून स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून, गुन्हेगारांना जलद ताब्यात घेतल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
