सिंदेवाही : श्री संत संताजी महिला संघटना, सिंदेवाही यांच्या वतीने दि. ९ ऑक्टोबर रोजी (गुरुवार) शरद पौर्णिमा निमित्त कोजागिरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रतिभावान विद्यार्थी प्रतीक हरणे याचा सत्कार करण्यात आला तसेच त्याची विदर्भ तेली समाज विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.या प्रसंगी विदर्भ तेली समाज केंद्रीय सदस्य माधव वरभे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी राम सेलोकर, ध्यान संवर्धन संस्था मोहाळी (नले.) चे सचिव प्रेमकुमार हरणे, श्री संत संताजी जगनाडे महाराज संस्था सिंदेवाहीचे घुगुस्कर, विदर्भ तेली समाज महासंघाचे चंद्रपूर जिल्हा सचिव भूपेश लाखे, सिंदेवाही तेली समाज महिला संघटनेच्या मुख्य सल्लागार डॉ. पद्मजा वरभे, सिंदेवाही नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षा आशा गंडाते, महिला संघटनेच्या उपाध्यक्षा अल्का कावळे व पुष्पा हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमादरम्यान प्रतीक पुष्पा प्रेमकुमार हरणे हा SET परीक्षेत प्राविण्य मिळवल्याबद्दल त्याचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांच्या सूचनेनुसार आणि आदेशावरून प्रतीक हरणे यांना विदर्भ तेली समाज विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी प्रदान करण्यात आली.प्रतीक हरणे यांनी यावेळी आपल्या मनोगतात म्हटले की, “विदर्भ तेली समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, समाजाच्या सहयोगाने आणि माता-पिता तसेच गुरुजनांच्या संस्कारांच्या बळावर श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा प्रसार करणार आहे.”कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी एकत्र येऊन बासुंदीचा आस्वाद घेत कोजागिरी पौर्णिमेच्या वातावरणात आनंदाने करण्यात आला.
