सावली तालुक्यातील हरांबा येथील तरुण शेतकरी आपल्या शेतावर काम करीत असतांना सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. प्रफुल ईश्वर चरडूके, वय ३९ वर्षे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी व आई वडील असा बराच मोठा आप्त परिवार असून हरांबा गावात प्रफुलच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. प्रफुल हा नेहमीप्रमाणे सोमवारला शेतावर पिक पाहणी करायला गेला. यावर्षीच्या अतिवृष्टीने पिकांना पावसाचे पाणी जास्त झाल्यामुळे पाणी सोडण्याचे काम करीत असतांना दुपारी दोन वाजता दरम्यान प्रफुलला सापाने दंश केला. प्रफुलने आरडाओरड केल्याने जवळच्या शेतकऱ्यांना माहिती होताच लगेच शेतकरी, गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली करीता उपचाराकरीता नेले असता उपचारादरम्यान काही वेळातच प्रफुलचे प्राणज्योत मालवली. प्रफुल हा घरातील एकटाच कमावता असल्याने चरडूके कुटूंबामध्ये दु:खाचे संकट ओढवले आहे. प्रफुल शांत व मनमिळावू स्वभावाचा असल्याने गावात सहकारी शेतकरी, मित्रांसोबत तसेच गावकऱ्यासोबत मिळून राहायचा. या घटनेने हरांबा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
