चंद्रपूर :
“नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्मपण ध्यान योग शिबीराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन श्री संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली, चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या शिबिरात जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार, त्यांच्या कुटुंबियांसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील नागरिक, विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश समाजातील व्यसनाधीनतेला आळा घालणे, मादक पदार्थांच्या वापराला प्रतिबंध करणे आणि “नशा मुक्त भारत” निर्माण करण्याच्या दिशेने नागरिकांना प्रेरित करणे हा होता.या शिबिराचे मार्गदर्शन हिमालयीन ध्यान योगाचे संस्थापक आणि समग्र योगाचे जागतिक प्रचारक महर्षी श्री शिवकृपानंद स्वामीजी यांनी केले. त्यांनी प्रवचन, ध्यान आणि प्रश्नोत्तर सत्राद्वारे उपस्थितांना आत्मजागृतीचा आणि ध्यान योगाचा गूढ व सहज मार्ग समजावून सांगितला. स्वामीजी म्हणाले, “भारतीय संस्कृती आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची भावना शिकवते. आत्मज्ञान आणि परमात्म्याशी जोडणारा हिमालयीन ध्यान योग हा आजच्या काळाची अत्यावश्यक गरज आहे.”
कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संदीप पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ध्यान आणि योगाच्या माध्यमातून नशामुक्ती साध्य होऊ शकते. त्यांनी म्हटले, “ध्यानामुळे मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता वाढते. नियमित ध्यान योगाचा सराव केल्यास व्यक्ती व्यसनांपासून दूर राहू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी या संस्काराचा आत्मसात करावा.”
तसेच पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, भावी पिढी निर्व्यसन आणि संस्कारी घडवण्यासाठी ध्यान योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नियमित ध्यान योग केल्यास त्यांच्या जीवनात अनुशासन, शांतता आणि आत्मविश्वास निर्माण होईल, असे त्यांनी मत व्यक्त केले.
या शिबिरात उपस्थित सर्वांनी “नशामुक्त भारत” घडविण्याचा संकल्प घेतला व शपथफलकावर स्वाक्षऱ्या करून व्यसनमुक्त राहण्याची प्रतिज्ञा केली.
सदर कार्यक्रमास मा. प्रा. डॉ. अशोक उईके (आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री, चंद्रपूर), मा. आमदार श्री सुधीर मुनगंटीवार, मा. आमदार श्री किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी.सी., विविध विभागांचे अधिकारी, शांतता समिती सदस्य, समाजसेवी संस्था, वरिष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन च्या सदस्यांनी परिश्रमपूर्वक योगदान दिले.
— फर्स्ट वंदे विदर्भ न्यूज 📰
