भिसी (ता. चिमुर, जि. चंद्रपूर) :
भिसी शहरातील दोन दुकाने फोडून रोकड आणि माल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना भिसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून, तिसरा आरोपी फरार आहे.
पोलीस ठाणे भिसी येथे फिर्यादी राकेश विजय खोब्रागडे (वय २७, रा. भिसी) यांनी तोंडी रिपोर्ट दिला की, दिनांक ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ ते २ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ‘राकेश ऑटो अँड हार्डवेअर’ दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेली ७,३०० रुपये रोकड चोरून नेण्यात आली. त्याचप्रमाणे शेजारील श्रीकांत ठोंबरे यांच्या ‘शरण्या इलेक्ट्रिकल्स’ या दुकानाचे लॉक तोडून आत प्रवेश करून तीन टेबल फॅन (किंमत ७,५०० रुपये) आणि १,५०० रुपये रोकड, असा एकूण १६,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
घटनेनंतर गावातील काही नागरिकांना प्रज्वल उर्फ नागेश वामन तुंबेकर हा रात्री संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्याला चौकशीसाठी थांबविले असता पेट्रोलिंग स्टाफ घटनास्थळी पोहोचला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याच्या साथीदारांचे नावे सांगितली – दीपक संजय छापेंकर व आयुष उर्फ गट्टु खोब्रागडे (दोघे रा. भिसी).
पोलिसांनी तत्काळ दीपक छापेंकरला अटक केली आणि त्याच्याकडूनही गुन्ह्याची कबुली मिळाली. मात्र, आयुष खोब्रागडे सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. तपासादरम्यान चोरीचा माल प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथील सरकारी निवासस्थानी युवराज खोब्रागडे याच्याकडे ठेवण्यात आल्याचे उघड झाले. आरोपींनी विक्री करून रक्कम वाटून घेण्याचा कट रचला होता.
भिसी पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या व चौथ्या आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, तसेच पोहवा हिरोज हनवते, पोअं सतिश झिलपे, पोअं श्रीकांत वाढई, पोअं स्नेहल खोब्रागडे, पोअं हर्षल दडमल, आणि पोअं साद शेख यांनी केली.
👉 भिसी पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीचा गुन्हा काही तासांत उकलला; नागरिकांत समाधानाचे वातावरण!
