राजुरा : पोलीस स्टेशन राजुरा येथे दाखल झालेल्या जबरीचोरीच्या गुन्ह्यात अवघ्या चार तासांत आरोपींना अटक करून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला असून या कारवाईत रोख ४२,३००/- रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किंमत ७०,०००/- रुपये असा एकूण १,१२,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० ते ९.५० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी हंसराज किसनराव दिघाडे (वय ५५, रा. तुकूम, चंद्रपूर) हे मौजा गडचांदूर येथून मार्केटिंगचे रोख पैसे घेऊन टाटा एन्ट्रॉ वाहनाने ड्रायव्हरसह राजुरा हायवेवरून येत असताना तीन अनोळखी व्यक्तींनी गाडी थांबवून लोखंडी रॉडने धमकावत एकूण ९३,०००/- रुपये जबरीने लुटून पलायन केले. या प्रकरणी फिर्यादीने २८ सप्टेंबर रोजी तक्रार दिल्याने राजुरा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र. ४७०/२०२५, कलम ३०९(४), १२६(२), ३(५) भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान फिर्यादीसोबत असलेल्या वाहनचालकावर संशय घेतल्यावर त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने आपल्या तीन साथीदारांसोबत कट रचून गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी सौरभ देविदास निलेवार (२३), जाकीर सादीक शेख (२५), अरबाज जाकीर शेख (२४), मुजाहिद आव्हद शेख (२६), सर्व रा. चंद्रपूर यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून रोख ४२,३००/- रुपये व गुन्ह्यातील दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा श्री. सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोनि सुमीत परतेकी यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून या कामगिरीत सपोनि हेमंत पवार, पोउपनि दीपक ठाकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, महेश बोलगोडवार, शफीक शेख, आनंद मोरे, बालाजी यामजवार, शरद राठोड, राजु दुबे (सर्व राजुरा पोलीस स्टेशन) यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
