नागभीड : “शिक्षक हा देशाच्या प्रगतीचा खरा शिल्पकार आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी अद्ययावत राहून नवनव्या पद्धती आत्मसात करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी केले. सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे नागभीड केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.
या परिषदेचे उद्घाटन संजय गजपुरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संजय पालवे तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख प्रभाकर करंबे आणि शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे उपस्थित होते. माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनानंतर परिषदेची सुरुवात करण्यात आली.
संजय गजपुरे यांनी आपल्या उद्गारात मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती हरवली असून प्रत्येकाने वाचनाची गोडी लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासनामार्फत वेळोवेळी होत असलेल्या शैक्षणिक बदलांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना उपक्रमशील बनविण्याचे आवाहन त्यांनी केले. “विद्यार्थी केवळ गुणांसाठी नव्हे तर जीवन जगण्यासाठी शिक्षण घेतात. त्यामुळे शिक्षकांनी त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करावा,” असेही गजपुरे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्राचा अभ्यास करून त्यांना आनंददायी शिक्षणातून संस्कार द्यावेत व सुजाण नागरिक घडवावेत, असे आवाहन केले. मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रभाकर करंबे यांनी विद्यार्थ्यांना निपुण बनविण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी सुरक्षा, शालेय पोषण आहार, भौतिक सोयी, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांवर भाष्य केले.
दिवसभर चाललेल्या या शिक्षण परिषदेत मराठी विषयाचे आदर्श पाठ मडावी मॅडम, गणित नगराळे मॅडम, इंग्रजी खोब्रागडे सर यांनी घेतले तर दिव्यांग शिक्षण विषयावर विंचूरकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महीपाल मांढरे सरांनी विशेष वर्ग घेतला.
या परिषदेत नागभीड केंद्रातील सर्व शाळांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक गोकुल पानसे, पराग भानारकर, आशिष गोंडाणे, सतिश जिवतोडे, आशा राजुरकर, किरण वाडीकर, मेघा राऊत, पुजा वीर, नेहा कावडकर आणि शितल पाकमोडे यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी “वंदे मातरम्”च्या घोषणेनं शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.
