चंद्रपूर, दि. २८ सप्टेंबर : शहरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या धारदार हत्यारे बाळगणाऱ्या एका तरुणाला चंद्रपूर शहर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक लोखंडी तलवार, कोयता व चाकू असा एकूण पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २८ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बाबुपेठ वॉर्डात एक युवक अवैधरित्या तलवार, कोयता व चाकू बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत आहे. तत्काळ पोलिसांनी पंचासमक्ष आरोपीच्या घरी छापा टाकला. छाप्यात आरोपी हरी पप्पु गोस्वामी (वय १९ वर्षे, रा. सोनामाता मंदिर मागे, बाबुपेठ वॉर्ड, चंद्रपूर) हा ताब्यात घेतला. तपासादरम्यान त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार, एक धारदार कोयता व एक धारदार चाकू असा एकूण ५०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ७१४/२०२५, कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (वरोरा) श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलाटे, विलास निकोडे, पोहवा लक्ष्मन रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर, जावेद सिद्दीकी, निकेश ढेंगे, मपोहवा भावना रामटेके, पोना कपुरचंद खैरवार, पोअं. रुपेश पराते, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, प्रफुल्ल भैसारे, मपोअ सारीका गौरकार व दिपीका झिंगरे यांनी परिश्रम घेतले.
