ब्रह्मपुरी, दि. १५ सप्टेंबर २०२५:
केंद्र पुरस्कृत योजनेतील BPL लाभार्थी – विशेषतः वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले Digital Life Certificate (DLC) त्वरीत काढून घेणे आवश्यक आहे, अशी महत्त्वाची सूचना तहसीलदार ब्रह्मपुरी यांनी दिली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येत आहेत.
केंद्र शासनाने लाभार्थ्यांचे हयात दाखले ऑनलाईन करण्यासाठी Beneficiary Satyapan App विकसित केले आहे. या अॅपद्वारे लाभार्थ्यांचे Digital Life Certificate (DLC) ऑनलाईन तयार करणे आणि पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र १००% पूर्ण करणे बंधनकारक आहे.
जिल्हा प्रशासनाने पत्र, नोटीस, प्रसिद्धी व प्रेसनोट याव्दारे वारंवार सूचना दिल्या असूनही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आपले Digital Life Certificate ऑनलाईन काढलेले नाही. त्यामुळे ते अनुदान पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तहसीलदार ब्रह्मपुरी यांनी आवाहन केले आहे की, ज्या लाभार्थ्यांचे Digital Life Certificate अद्याप तयार झालेले नाही त्यांनी तात्काळ आपल्या भागातील महसूल सेवक किंवा सेतू केंद्र येथे जाऊन प्रमाणपत्र तयार करून घ्यावे. DLC अपडेट न झाल्यास लाभार्थ्यांना अनुदान बंद राहण्याची शक्यता असल्याने याकडे तत्काळ लक्ष द्यावे.
ही योजना आणि प्रक्रिया लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, संबंधित सर्वांनी वेळेत आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन तहसील कार्यालयाने केले आहे.
