चंद्रपूर : महाकाली मंदीर परिसरात दिनांक ०७/०७/२०२५ रोजी एका ६५ वर्षीय वृध्द महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस चंद्रपूर न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी अयुब खान साहेब खान पठाण (रा. गडचिरोली) याच्याविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७५५/२०२५ नोंदवून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७५ (i), (ii), ७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोउपनि. तृप्ती खंडाईत यांनी करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश – १, श्रीमती अभिश्री देव यांच्या न्यायालयात झाली. पुरावे आणि साक्षी यांच्या आधारे आरोपी दोषी आढळून आल्याने त्यास भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ६४ (२) (के) सह ६२ नुसार ५ वर्ष सक्त मजुरी व ५,००० रुपये दंड तसेच कलम २५८ (२) नुसार ६ महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
सरकारी अभियोक्ता अॅड. एस. आर. डेगावार यांनी बाजू मांडली, तर पैरवी अधिकारी पोहवा / २३७० किशोरी यांनी काम पाहिले.
ही घटना समाजासाठी धक्कादायक असली तरी न्यायालयाने वेळेवर आणि प्रभावी न्याय दिल्याने पीडितेला दिलासा मिळाला आहे.

