नवतळा येथे ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येकाला समाजाचे देणे असते. लहानपणी आजोबांच्या हातून घडलेली जनसेवा यातूनच प्रेरणा घेऊन कुठलाही स्वार्थ न बाळगता राजकारणात आलो. आपण सर्वांनी सेवा करण्याची जी तिसऱ्यांदा मला संधी व बळ दिले. त्यातून क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सदैव मी प्रयत्नशील आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असून जनसेवेतच परमोच्च आनंदाची अनुभूती होते असे प्रतिपादन चिमुर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांनी केले. ते चिमूर तालुक्यातील नवतळा येथील सामाजिक सभागृहांच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी उद्घाटक म्हणुन बोलत होते.
आमदारांचे स्थानिक विकास निधी अंतर्गत नवतळा येथे हनुमान मंदिर लगत, तसेच गुरुदेव प्रार्थना मंदिराच्या बाजूला अनुक्रमे अंदाजित किंमत ३० व २६ लक्ष असे दोन सामाजिक सभागृह मंजूर करण्यात आले. या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. आयोजित भूमिपूजन सोहळ्यास प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिलीप शिवरकर, भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, राज्य परिषद सदस्य राजू पाटील देवतळे, माजी सभापती घनश्याम डुकरे, सेवानिवृत्त नियोजन अधिकारी डहारे,भाजप महिला आघाडीच्या माया नन्नावरे, महादेव कोकोडे, उपसरपंच शिवरकर, विलास कोराम, टिकाराम पिसे, यांचेसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया म्हणाले की, जनतेच्या समस्यांना प्राधान्याने सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य असून माझ्या पाठीशी खंबीर उभा असलेला जनधार हीच माझी खरी संपत्ती आहे. या जनसामान्यांच्या दृढ आत्मविश्वासाला मी कदापीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तर चिमूर तालुक्यातील नवतळा गावाला आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांनी विकासाच्या दृष्टीने ३४ हून अधिक कामे दिली असून आगामी काळात शिल्लक कामे देखील पूर्ण होणार अशी माहिती आपल्या प्रास्ताविकातून महादेव कोकोडे यांनी दिली. तर अनेक आमदार, खासदार केवळ पोकळ आश्वासनांची खैरात वाटून जनतेचे भ्रमनिरास करतात. मात्र चिमूर विधानसभा आमदार बंटी भांगडिया हे दिलेले वचन पाळून जनतेची समस्या सोडविण्यात सदा अग्रेसर रहात असल्याचे उपस्थितांनी आपल्या भाषणातून सांगितले. नवतळा वासियांच्या आर्थिक देवाण घेवाण समस्या संबंधी योग्य पाठपुरावा करून नवतळा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सुरु करण्या संबंधी प्रयत्न करणार असे आश्वासन यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष संजय डोंगरे यांनी दिले. आयोजित कार्यक्रमास चिमूर तालुका भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
