राजुरा-गडचांदूर मार्गावरील भीषण अपघातात सहा ठार तर दोन गंभीर जखमी !
राजुरा: राजुरा तालुक्यातील कापणगांवसमीपच्या राष्ट्रीय महामार्गावर आज झालेल्या एका रस्ता अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यूने कवटाळले ! याच घटनेत अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या जोरदार धडकेत ऑटो पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
हृदयदायक भीषण अपघातामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांच्या नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजुराहून खामोना दिशेला प्रवासी घेऊन ऑटो क्रं एमएच 34 डी 3941 जात असताना गडचांदूरकडून रस्ते कामासाठी येणारा ट्रक क्रमांक आर,जे 14 जे,ओ ,९२२१ वेगात आला. कापणगावाजवळील ओव्हरब्रिजवर ट्रकने ऑटोला जबरदस्त धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रक चालकाने ऑटोला जवळपास 30 ते 40 मीटरपर्यंत फरफटत नेले.
त्यामुळे ऑटोमधील प्रवास करणारे 5 जण जागीच मृत्यू पावले जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेत एकाचा मृत्यू झाला. वर्षा बंडू मांदाडे (40), रवींद्र हरी बोबडे (50), शंकर पिपरे (55), तारा पुप्पलवार (60), प्रकाश मेश्राम (55) असे मृतकाचे नाव असून तन्वी सुभाष पिंपळकर यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.
जखमी प्रवासी मध्ये निर्मला झाडे व भोजराज कोडापे यांचा समावेश असून ते भुरकुंडा येथील रहिवाशी असल्याचे समजते.
ऑटोमध्ये एकूण आठ प्रवासी होते. मृतांपैकी बहुतेक जण राजुरा व याच परिसरातील असून, त्यांच्या मूत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, राजस्थान, गुजरातसह इतर बाहेरील राज्यातील ट्रक वाहतूक होत आहे. काही काळ वातावरण तंग झाले होते, मात्र पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
