सणोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सिंदेवाही पोलिसांची तयारी पक्की
सिंदेवाही (२५ ऑगस्ट २०२५):
आगामी सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सिंदेवाही पोलिस ठाण्याच्या वतीने सोमवारी मॉक ड्रिल आणि रूट मार्च आयोजित करण्यात आला.
दुपारी ४ ते ५ या वेळेत फटाका ग्राऊंड येथे झालेल्या मॉक ड्रिलमध्ये ५ अधिकारी, २५ अंमलदार आणि २४ होमगार्ड सहभागी झाले. आकस्मिक परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलीस दल किती सज्ज आहे, याचे दर्शन या सरावातून घडले.
यानंतर सायंकाळी ५ वाजता सिंदेवाही पोलिस स्टेशनहून रूट मार्चला सुरुवात झाली. सिद्धार्थ चौक, गुरुदेव चौक, बाजार चौक, राम मंदिर चौक, कोहळी मोहल्ला, खाती मोहल्ला, आंबेडकर चौक या प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला. पुन्हा सिद्धार्थ चौक मार्गे पोलिस स्टेशनपर्यंत हा मार्च संपन्न झाला. या रूट मार्चमध्येही ५ अधिकारी, २५ अंमलदार आणि २४ होमगार्ड सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे नागरिकांत विश्वास व सुरक्षिततेची भावना दृढ झाली, तर कायदा मोडणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला. सिंदेवाही पोलिस दलाने दाखवलेली शिस्त, सज्जता आणि तत्परता यामुळे आगामी सण शांततेत व आनंदात पार पडतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
