वासेरा येथे बैल सजावट स्पर्धा उत्साहात साजरी
एकूण 90 बैल जोडी मालकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
सहभागी बैलजोडी मालकांना आकर्षित भेटवस्तू देऊन केले सन्मानित
सिंदेवाही – शेतकरी राज्याला समृद्ध करणाऱ्या आणि सदैव देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा. शेतकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या सर्जा राजाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. या दिवसाचे औचित्य साधून समस्त वासेरा ग्रामवासियांच्या वतीने बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून उत्कृष्ट बैल सजावट करणाऱ्या तीन बैलजोडी मालकांना योग्य बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे बैलपोळा. कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. असे असले तरी यांत्रिक युगात दिवसेंदिवस बैलांची संख्या मंदावलेली आहे. मात्र आहे सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा न करता उत्कृष्ट बैलजोडी सजावट करणाऱ्या बैलजोडी मालकांचा सन्मान करून त्यांना योग्य बक्षीस देण्यासाठी समस्त गावकऱ्यांच्या वतीने पोळ्याचे दिवशी बैलजोडी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ऐकून ९० बैलजोडी मालकांनी सहभाग घेऊन आपल्याला बैलजोड्या सजावट करून आणि उत्कृष्ट देखावा सह बैल पोळ्यात बैलजोडी आणली. नेहमीच्या महादेव मंदिराजवळ पोळा भरविण्यात आला. यावेळी पोळ्याच्या झाडत्यांनी बैलपोळा दुमदुमला होता. शेवटी तानुजी बोरकर यांचे हस्ते बैलजोडीची पूजा करून आंब्याचे पानाचे तोरण तोडण्यात आले. आणि पोळा फुटला असे जाहीर करण्यात आले. पोळ्यामध्ये सहभागी झालेल्या बैलजोड्यांचे योग्य निरीक्षण करून गुणदान करण्यात आले. यामध्ये रवींद्र कोठेवार यांची बैलजोडी उत्कृष्ट सजावट केली असल्याने ती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. तर देविदास आनंदे यांची बैलजोडी दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. संभाजी बोरकर यांची बैलजोडी तिसरा क्रमांक, करण तोंडफोडे चौथा क्रमांक , आणि योगेश सहारे पाचवा क्रमांक. असे गुणानुक्रम ठरले. पाचही बैलजोडी मालकांना योग्य बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बैलजोडी मालकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. बैलजोडी सजावट स्पर्धेचे परीक्षण उपसरपंच महेश बोरकर, पोलिस पाटील देवेंद्र तलांडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील नवतरुणानी परिश्रम घेतले.
