चंद्रपूर (ता. चंद्रपूर) — शहरात दहशत माजवणाऱ्या आणि नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास रामनगर पोलिसांनी शेवटी गजाआड केले आहे. पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिसांनी आनंद उर्फ गुड्डु रविंद्र गेडाम (वय 23, रा. डॉ. आंबेडकर कॉलेज जवळ, मित्रनगर, चंद्रपूर) या सराईत गुन्हेगारास एक वर्षाकरिता स्थानबद्ध केले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, सदर गुड्डु गेडाम याच्यावर सन 2020 ते 2025 या कालावधीत शरीराविरुद्ध आणि मालमत्तेवरील १५ ते २० गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे, आग लावणे, दंगा करणे, शिवीगाळ व धमकी देणे अशा गंभीर प्रकरणांचा समावेश आहे.यापूर्वी त्याच्यावर कलम 110 (ई), (ग) जाफीनुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याने बंधपत्राच्या काळातही गुन्हेगारी प्रवृत्ती कायम ठेवल्याने त्याचा बॉन्ड रद्द करण्यात आला. नागरिकांमध्ये भीती निर्माण करून तो परिसरात दहशत पसरवत असल्याने रामनगर परिसरातील लोक त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास धजावत नव्हते.सदर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रामनगर पोलिसांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर आणि काळाबाजार करणारे’ यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 (सुधारणा 2009, 2015) अंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होतामा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आनंद उर्फ गुड्डु गेडाम यास दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले. त्यास प्रथम जिल्हा मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले असून पुढे त्यास सोलापूर कारागृहात हलविण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चौगुले, पोलिस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत प्रभारी सपोनि योगेश खरसान, पोउनि सुरेंद्र उपरे, तसेच गुन्हे अन्वेषण पथकातील पोहवा संजु देशवाले, अरुण खारकर, परवेज शेख, अनिल जमकातन, राजु चिताडे, मपोहवा मनीषा मोरे, मपोशि ब्ल्युटी साखरे यांनी मोलाची भूमिका बजावली.
