नागभीड (प्रतिनिधी) :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो गावे जलमय झाली असून, हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरे पडझड झाली, धान्य वाहून गेले आणि हजारो शेतकरी उपासमारीच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहेत. शासनाकडून मदतकार्य सुरू असले तरी सामाजिक संस्था सुद्धा मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत.
अशाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘तरंगिनी रास गरबा ग्रुप’च्या वतीने पूरग्रस्त बांधवांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या ग्रुपतर्फे तीन हजार रुपयांचा धनादेश नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
“भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” — या प्रतिज्ञेतील भावनेतूनच पूरग्रस्त भाऊ-बहिणींना मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याचा संदेश या छोट्याशा मदतीद्वारे ‘तरंगिनी’ ग्रुपने दिला आहे.
या प्रसंगी तहसीलदार प्रताप वाघमारे आणि नायब तहसीलदार कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तरंगिनी ग्रुपतर्फे प्रिया लांबट, भाविशा पटेल, आरती टहलानी, रोमी कटारे, गणेश नागापुरे, वैभव पिसे, पराग भानारकर, प्रणय दरवरे, आणि निलेश मिसार आदी सदस्य उपस्थित होते.
