सिंदेवाही :
वन्यजीव सप्ताह (१ ते ७ ऑक्टोबर) साजरा करण्याच्या निमित्ताने सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालय व स्वाब नेचर केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिटकी येथे पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सिंदेवाही ते चिटकी असा १५ किलोमीटरचा बाईक रॅली काढण्यात आला. त्यानंतर स्थानिक शाळेच्या विद्यार्थ्यांसह गावभर पायदळ रॅली काढण्यात आली. “वृक्ष लावा–जीवन वाचवा!”, “वन्य प्राण्यांचे संरक्षण करा!” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक संदेश जनतेपर्यंत पोहोचवला.
यानंतर चिटकी जिल्हा परिषद शाळेत सर्प व वन्यजीव या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गावात पकडलेल्या नागाबाबत स्वाब संस्थेच्या सर्पमित्रांनी जनजागृती केली व सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले.
विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी चिटकी येथे मृत्यू झालेल्या हत्तीच्या स्मरणार्थ त्याच जागी वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. नंतर उपस्थितांनी वडाच्या झाडाभोवती मानवी शृंखला बनवून श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाचे नेतृत्व सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार/बोरावार यांच्या मार्गदर्शनाखाली आर. जी. कोडापे (क्षेत्र सहाय्यक तांबेगडी) व स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी केले. यावेळी स्वाब बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, शैक्षणिक विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, सहसचिव हितेश मुंगमोडे, सर्पमित्र महेश बोरकर, गणेश गुरनुले, गणेश गावतुरे, अनमोल सेलोकर, कैलास बोरकर, प्रतिकार बोरकर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वन विभागाचे संतोष पेंदाम, एस.एल. सोरते, डी.एस. किनेकर, एस.एम. गजभे, बी.डब्ल्यू. टेकाम, तसेच स्थानिक पोलीस, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पीआरटी सदस्य व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या सर्व उपक्रमांमधून पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड व वन्यजीव संरक्षणाचा ठसा उमटला.
