सिंदेवाही, २४ सप्टेंबर :
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही आणि कृषी विभाग जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रोक्त मधमाशी पालन या विषयावर सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा समारोप आज उत्साहात पार पडला.
समारोप कार्यक्रमात विषय तज्ञ स्नेहा वेलादी यांनी मार्गदर्शन करताना, कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाची निवड करण्याचे आवाहन युवा शेतकऱ्यांना केले. तसेच विषय तज्ञ डॉ. विजय सिडाम यांनी शेतकऱ्यांना स्वावलंबनासाठी शेतीपूरक व्यवसायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षणादरम्यान तज्ञ मार्गदर्शक व मध व्यावसायिकांनी मधमाशी पालन, मध उत्पादन तंत्रज्ञान, बाजारपेठेतील मागणी आणि व्यवसायातील संधी याबाबत सखोल माहिती दिली. प्रशिक्षणार्थींना शास्त्रोक्त पद्धतीसह प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणास कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सोनाली लोखंडे आणि डॉ. वर्षा जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. आशिष पांडे, श्री. निलेश वार यांच्यासह संपूर्ण कर्मचारीवृंदाचे सहकार्य लाभले.
सदर प्रशिक्षण हे कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. ✅
राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानांतर्गत सिंदेवाहीत सात दिवसीय शास्त्रोक्त मधमाशी पालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न
