चंद्रपूर, दि. 12 सप्टेंबर 2025 – भादुर्ली येथून मुलंकडे जाणारी चंद्रपूर आगाराची बस (क्रमांक MH40 N 9426) दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 6.15 वाजता रेल्वेपटरीखालील बोगद्यात अडकली. बोगद्यात अंदाजे एक ते दोन फूट पाणी असल्याने बस निघेल असा समज करून चालकाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसचा सायलेन्सर पाण्याला लागल्याने इंजिन बंद पडले. त्यानंतर पाऊस वाढल्याने बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि गाडीच्या रेडिएटरपर्यंत पाणी पोहोचले. परिणामी बस अडकून राहिली.
घटनेच्या वेळी बसमध्ये तीन प्रवासी प्रवास करत होते. चालक व वाहक यांनी तातडीने खबर दिल्यानंतर प्रशासनाने मदतीसाठी यंत्रणा रवाना केली. आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी आणि सहाय्यक यंत्र अभियंता यांसह यांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व प्रवासी आणि चालक-वाहक सुखरूप आहेत.
प्राथमिक तपासात ही घटना चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने पुढील कारवाई सुरू केली असून प्रवाशांना इतर वाहनाने गंतव्यस्थानी पोहोचविण्यात येत आहे.
