काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पना
ब्रह्मपुरी :-
ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश उत्सव २०२५ हे वर्ष अविस्मरणीय ठरले. कारण, यंदाच्या उत्सवाला केवळ धार्मिकच नव्हे तर बौद्धिक अधिष्ठानही लाभले. विजयभाऊ वडेट्टीवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार, ब्रह्मपुरी विधानसभा यांच्या संकल्पनेतून ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण, ब्रह्मपुरी येथे “जनसुरक्षा विधेयक २०२४ योग्य की अयोग्य?” या अत्यंत ज्वलंत व राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर भव्य वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील १० संघांचे २० विद्यार्थी सहभागी झाले. प्रत्येक स्पर्धकाने अभ्यासपूर्ण मांडणी, धारदार तर्क-वितर्क व आत्मविश्वासपूर्ण शैलीतून आपली भूमिका ठामपणे मांडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विषयाच्या योग्य व अयोग्य दोन्ही बाजूंनी केलेली विवेचनं ऐकणाऱ्यांना विचारप्रवृत्त करून गेली.लोकार्पण महाविद्यालय गांगलवाडीचा विद्यार्थी तेजस राजेंद्र दोनाडकर याने विषयाच्या अयोग्य बाजूने ठोस मांडणी करत प्रथम पारितोषिकाचा मान मिळवला. त्याला ११,००० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. शोभाताई बन्सोड महाविद्यालय, ब्रह्मपुरीचा गणेश संतोष बगमारे याने विषयाच्या विरुद्ध बाजूने आपली बाजू प्रभावीपणे मांडत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याला ७,००० रुपये रोख पारितोषिक मिळाले. महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरीचा रोहित दिवाकर मेश्राम याने इतिहास आणि वर्तमानाची तुलना करत/ महत्व सांगत मांडणी केली व तृतीय क्रमांक मिळवत ५,००० रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, बेटाळा येथील रोहिणी नानाजी खेवले हिने आपल्या तर्कशुद्ध मांडणीच्या बळावर प्रोत्साहनपर पारितोषिकाचा मान मिळवत ५,००० रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज मेश्राम यांनी उत्कट शैलीत केले. परीक्षक म्हणून प्रा. डी.के. मेश्राम, डॉ. प्रा. एस.एस. गुधडे, बुल्ले सर व प्रा. सूरज तलमले यांनी स्पर्धकांच्या कामगिरीचे बारकाईने परीक्षण केले. प्रमुख पाहुणे म्हणून खेमराज तिडके, हितेंद्र राऊत, वासुदेव सोंदरकर, मोंटू पिलारे, कल्पना गेडाम, अतुल राऊत, मनमोहन ब्राडिया आदी मान्यवर उपस्थित होतेi कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲड. आशिष गोंडाने, रवि मैंद, सुनील विखार, राहुल भोयर, निनाद गडे, मोहन मिसार यांनी विशेष परिश्रम घेतले.वादविवाद स्पर्धेचा गाभा म्हणजे “जनसुरक्षा विधेयक २०२४” या विषयाची गांभीर्यता. एका बाजूने ते देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे ठामपणे मांडले गेले, तर दुसऱ्या बाजूने ते वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे ठरू शकते, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. स्पर्धेत सहभागी सर्व २० विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना धारदार तर्कांची जोड देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या स्पर्धेतून ब्रह्मपुरीच्या युवकांना केवळ वक्तृत्वाचे व्यासपीठ मिळाले नाही, तर “लोकशाहीत तरुणांचा आवाज किती महत्त्वाचा आहे” हे अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांनी स्वतःतील वादविवादाची क्षमता व सामाजिक प्रश्नांवरील दृष्टिकोन सिद्ध करून दाखवला.ज्यांच्या संकल्पनेतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा गांभीर्यपूर्ण विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामुळे अभ्यास, विचारमंथन व स्वसंवादाची संधी मिळाल्याने कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.
